पंतप्रधानांच्या घोषणांनंतर निर्माण झालेला इंधन तुटवडा शेतकऱ्यांच्या मुळावर — आमदार सिद्धार्थ खरात

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार डिझेल उपलब्ध करून देण्याचे निर्देश;

-मेहकर व लोणार तालुक्यातील पेट्रोल पंप मालकांची बैठक

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे केलेल्या विविध घोषणांनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असल्याचे मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार डिझेल उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश त्यांनी पेट्रोल पंप मालकांना दिले.

आज १८ मे रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील पेट्रोल पंप मालकांची बैठक स्थानिक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सिद्धार्थ खरात होते. यावेळी बोलताना आमदार खरात म्हणाले की, अलीकडील परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही नागरिकांनी पेट्रोल व डिझेलचा अतिरिक्त साठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून कृत्रिम टंचाईसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात इंधनाचा पुरवठा कमी झालेला नसून मागणी अचानक वाढल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे.

सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ट्रॅक्टरसाठी डिझेलची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती गावापासून दूर असल्याने डिझेल संपल्यास वारंवार पेट्रोल पंपावर येणे शक्य होत नाही. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी व्यवहारिक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत वाहनधारक आणि कॅनधारकांसाठी स्वतंत्र नोजलची व्यवस्था करण्याबाबतही चर्चा झाली. तसेच टोकन किंवा क्रमांक पद्धतीने पेट्रोल व डिझेल वितरणाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, अवैधरित्या अतिरिक्त दराने पेट्रोल व डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारींचीही गंभीर दखल घेण्यात आली. रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर, शासकीय वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

तेल कंपन्यांकडून पुरेसा साठा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचेही आमदार खरात यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष पथके नियुक्त करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, मेहकर तहसीलदार निलेश मडके, लोणार तहसीलदार भूषण पाटील, मेहकर ठाणेदार व्यंकटेश आलेवार, नगराध्यक्ष किशोर गारोळे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवासेना तालुकाप्रमुख आकाश घोडे, नगरसेवक नितीन तुपे यांच्यासह संबंधित अधिकारी, पेट्रोल पंप मालक, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version