साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगा; वाहनांसोबतच ड्रम, कॅनही लाईनमध्ये

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-इंधन टंचाईमुळे शेतीची कामे रखडली; पोलिस बंदोबस्तात इंधन वितरणाची वेळ

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात इंधन टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असून, याचा सर्वाधिक फटका शेतीमध्ये काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना बसत आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. साखरखेर्डा येथे असलेल्या दोन्ही पेट्रोल पंपांवरही असेच चित्र निर्माण झाले आहे.

साखरखेर्डा येथे दोन पेट्रोल पंप असून चार दिवसांनंतर पेट्रोल व डिझेलचे टँकर येत आहेत. एका वेळी सुमारे ३ हजार लिटर पेट्रोल आणि ९ हजार लिटर डिझेल उपलब्ध होत असले तरी काही तासांतच इंधन संपल्याचा फलक लावण्याची वेळ येत आहे. परिणामी अनेक वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

आज दुपारी दोन्ही पेट्रोल पंपांवर फेरफटका मारला असता वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. डिझेल आणि पेट्रोल नेमके कधी येईल याची निश्चित वेळ वाहनधारकांना माहित नसली तरी इंधन आल्यावर आपल्याला मिळावे, या अपेक्षेने नागरिक तासन्तास प्रतीक्षा करताना दिसत होते. सकाळी १० वाजता पाटील ब्रदर्स पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल आल्यानंतर वाहनांची गर्दी आणखी वाढली. काही ठिकाणी ड्रम आणि कॅन रांगेत ठेवलेले दिसून आले. मात्र पाटील ब्रदर्स तसेच ओंकार पेट्रोल पंपावर वाहनाशिवाय ड्रम किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील ड्रम आणि कॅनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेती मशागतीवर परिणाम

मार्च आणि एप्रिल महिन्यात रब्बी हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली असून आता मे महिन्यात शेती मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. नांगरणी आणि वखरपाळी वेळेत होणे गरजेचे असताना डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ट्रॅक्टर चालकांकडून “आधी डिझेल द्या, नंतर पैसे द्या” अशी अट घालण्यात येत असल्याने पेट्रोल पंपांवर कॅन आणि ड्रम घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, शासनाने फक्त वाहनांमध्येच इंधन भरण्याचे आदेश दिल्यामुळे पेट्रोल पंप चालकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आता पोलिस बंदोबस्तात पेट्रोल आणि डिझेलचे वितरण करण्याची वेळ आली आहे. “पेट्रोल पंपावर काल रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. इंधनाची आवक कमी झाल्याने प्रत्येकाला पेट्रोल आणि डिझेल मिळावे, यासाठी नियोजनपूर्वक वाटप करण्यात येत आहे,” अशी माहिती पेट्रोल पंप चालक अरविंद बेंदाडे आणि रविंद्र पाटील यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version