-एसटीच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; खाजगी वाहनांमध्ये कोंबाकोंबी वाढली
लोणार (वाजिद खान) : जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लोणार शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून, याचाच गैरफायदा घेत खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची राजरोसपणे लूट आणि जीवघेणी कोंबाकोंबी केली जात आहे. दररोज हजारो नागरिक, महिला आणि शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत असताना, या गंभीर समस्येकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नियमांची पायमल्ली; अपघातांना निमंत्रण
लोणार ते सुलतानपूर, किनगाव जट्टू, लोणी आणि बीबी या प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या खाजगी जीप, ट्रॅक्स आणि ऑटो रिक्षांमध्ये वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. चालकाच्या दोन्ही बाजूंना धोकादायकरित्या प्रवासी बसवले जात असून, अनेकदा वाहनांच्या मागील भागाला लटकून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहनांमध्ये अक्षरशः कोंबाकोंबी होत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे लोणार परिसरात मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
एसटीच्या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय
ग्रामीण भागातून लोणार शहरात येण्यासाठी वेळेवर शासकीय बसेस उपलब्ध नसणे हेच अवैध वाहतूक वाढण्यामागील प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक मार्गांवर बसेसच्या पुरेशा फेऱ्या नसल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अखेर वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी नागरिकांना बेकायदेशीर खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे एकीकडे शासकीय महसुलाचे नुकसान होत असताना, दुसरीकडे खाजगी वाहतूकदार मात्र मोठ्या प्रमाणात फायदा मिळवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

