आळंदीत मुंबई डबेवाला धर्मशाळेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स ट्रस्टतर्फे दीड कोटी रुपयांची तीन मजली इमारत उभारणार

आळंदी (अर्जुन मेदनकर) : नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट व मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन यांच्या वतीने तीर्थक्षेत्र आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या मुंबई डबेवाला धर्मशाळेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. मुंबईचे आमदार श्रीकांत भारतीय आणि खेड तालुक्याचे आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारी ही नवीन तीन मजली इमारत वारकरी भाविक, चाकरमानी आणि प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. वारकरी परंपरा आणि सेवाभाव जपत आळंदी येथे धर्मशाळा उभारण्याचा उपक्रम संघटनेने हाती घेतला असून, या माध्यमातून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे, पंचायत समिती सदस्या सारिका गोगावले, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, खरेदी-विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे, अॅड. अमृता गुरव, प्रिया पवार, संघटनेचे खजिनदार बारकू फापाळे, रामदास करवंदे, दिंडी मालक माधव रणपिसे, भिमाशंकर सेवा मंडळाचे अध्यक्ष गिरजूशेठ चांभारे, औंढेचे सरपंच प्रदीप शिंदे, वाजवणेचे माजी सरपंच चंद्रकांत आंद्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई डबेवाला संघटनेची स्थापना सन १८८८ मध्ये वाजवणे गावचे कै. महादू आवजी बच्चे यांनी केली होती. संघटनेचे पहिले अध्यक्ष औदर गावचे कै. धोंडीभाऊ रामभाऊ मेदगे होते. त्यानंतर कै. गंगाराम तळेकर, रघुनाथ मेदगे आणि सबाजी मेदगे यांनी संघटनेच्या वाढीसाठी मोठे योगदान दिले.

१३६ वर्षांची परंपरा असलेल्या या संघटनेचे राज्यातील सहा तालुक्यांमध्ये सुमारे २५०० सभासद आहेत. पंढरपूर, जेजुरी, आळंदी आणि भीमाशंकर येथे संघटनेच्या धर्मशाळा व जागा उपलब्ध आहेत. संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून डबेवाल्यांसाठी डबेवाले भवन, ५००० फ्लॅटची घरे, तसेच कोरोना काळात अन्नधान्य, कपडे, सायकली, मोबाईल, टॅब यांसारख्या सुविधा पुरविण्यात आल्या. याशिवाय २०८ डबेवाल्यांना दुचाकींचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे माजी अध्यक्ष सोपान मरे यांनी केले. सूत्रसंचालन किरण गवांदे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सबाजी मेदगे यांनी केले.

Share This Article
Exit mobile version