जनगणना २०२७ अंतर्गत ‘घर गणना’ मोहिमेला चिखली तालुक्यात सुरुवात

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे तहसीलदार तथा चार्ज अधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे)  : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशपातळीवर राबविल्या जाणाऱ्या जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘घर गणना’ (Houselisting) आणि घरांची यादी तयार करण्याच्या महत्त्वपूर्ण मोहिमेला आजपासून चिखली तालुक्यात अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. सदर गणना मोहीम दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी पार पडणार असल्याची माहिती चिखलीचे तहसीलदार तथा चार्ज अधिकारी (ग्रामीण) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

चिखली तालुक्याचे सांख्यिकीय नियोजन

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी चिखली तालुका प्रशासनाने चोख पूर्वतयारी केली असून संपूर्ण तालुक्यात एकूण ३८६ हाऊस लिस्टिंग ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. तसेच ३६४ प्रगणक आणि ६१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त प्रगणक आणि पर्यवेक्षक, ज्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ते तालुक्यातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘स्व-गणना’ सुविधा

यंदाच्या जनगणनेमध्ये पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी अत्याधुनिक मोबाईल ॲप आणि डिजिटल माध्यमांचा वापर केला जात आहे. त्यामुळे गोळा होणारी माहिती अधिक सुरक्षित आणि अचूक राहणार आहे. या वेळी नागरिकांना स्वतः इंटरनेटद्वारे ‘स्व-गणना’ करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी किंवा कुटुंबांनी ऑनलाइन पद्धतीने आपली स्व-गणना पूर्ण केली आहे, त्यांनी प्रगणक प्रत्यक्ष घरी आल्यानंतर त्यांना आपला SE ID (Self-Enumeration ID) देणे आवश्यक आहे. हा आयडी दिल्यास पुन्हा माहिती भरण्याची गरज भासणार नाही.

नागरिकांची जबाबदारी आणि कायदेशीर तरतुदी

जनगणना ही देशाच्या आणि राज्याच्या भावी लोककल्याणकारी योजनांचा पाया मानली जाते. जनगणना कायदा १९४८ नुसार प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना खरी, अचूक आणि परिपूर्ण माहिती देणे हे त्यांचे कायदेशीर आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते आणि तिचा वापर कोणत्याही प्रकारच्या कर आकारणी किंवा चौकशीसाठी केला जात नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली किंवा माहिती देण्यास नकार दिला तर जनगणना कायदा १९४८ च्या कलम ११ नुसार संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन

चार्ज अधिकारी (ग्रामीण) तथा तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या दारी येणाऱ्या प्रगणकांना पूर्ण सहकार्य करावे. घराची व कुटुंबाची खरी, अचूक आणि संपूर्ण माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांनी ‘स्व-गणना’ केली आहे त्यांनी आपला SE ID प्रगणकाकडे नोंदवावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Share This Article
Exit mobile version