अंत्री कोळीमध्ये पाणीटंचाईचा कहर; २ किमी पायपीट करून परक्या विहिरीवर धुणी-भांडी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-१५ दिवसांपासून गाव कोरडेठाक, महिलांची पाण्यासाठी वणवण

चिखली (महेंद्र हिवाले) : तालुक्यातील अंत्री कोळी गावात भीषण पाणीटंचाईने हाहाकार उडाला आहे. तीन महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा सुरू होता, मात्र मागील १५ दिवसांपासून नळाला थेंबभरही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांची दयनीय अवस्था झाली आहे. गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी तब्बल २ किलोमीटर पायपीट करून परक्या विहिरीवर जावे लागत आहे.

गावात नळाला पाण्याचा थेंबही नसल्याने महिला-भगिनींना दररोज दूरवर असलेल्या शेतातील आणि माळरानावरील विहिरींवर जाऊन कपडे धुवावे लागत आहेत. त्याच ठिकाणाहून डोक्यावर हंडे भरून पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याने महिलांचे मोठे हाल होत आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून शाळकरी मुलांच्या शिक्षणावरही याचा परिणाम होत आहे. “आमचा गावचा माणूस पंचायत समिती चिखली येथे बीडीओ समाधान वाघ आहे आणि गावात सरपंच (प्रशासक) सुभाष ठेंग यांची समिती कार्यरत आहे. तरीदेखील आम्हाला २-२ किलोमीटर पायपीट करून परक्या विहिरीवर पाण्यासाठी जावे लागत आहे. तीन महिने आम्ही नळाला कमी प्रमाणात येणाऱ्या पाण्यावर निभावून नेत होतो, पण आता १५ दिवसांपासून पूर्णपणे पाणी बंद आहे,” अशी व्यथा एका ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

वाघापूर विहिरीतून पाईपलाईनची ग्रामस्थांची मागणी

या गंभीर समस्येवर ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपायही सुचवला आहे. वाघापूर येथील विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने त्या विहिरीपासून अंत्री कोळी गावापर्यंत तातडीने पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना कायमस्वरूपी कार्यान्वित करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

आमदार श्वेता महाले यांनी लक्ष देण्याची मागणी

ग्रामस्थांनी मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनीही या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. पाणीटंचाईमुळे गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“तीन ते चार दिवसांत पाणीपुरवठा सुरू करू” — सरपंच सुभाष ठेंग

याबाबत सरपंच सुभाष ठेंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “वाघापूरच्या विहिरीतून पाईपलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत गावकऱ्यांना पाणी मिळेल.” दरम्यान, पंचायत समिती चिखलीचे गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Share This Article
Exit mobile version