दीड लाखात देखणी, बैलजोडीला सोन्याची चकाकी, सर्जा राजा शेतकऱ्यांचा दागीनाच!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आमदार सिद्धार्थ खरातांना बैलजोडीची भुरळ; जानेफळ बैल बाजारात मारला फेरफटका

बुलढाणा / मेहकर – (बाळू वानखेडे) : नाही म्हटले तरी बैलांच्या कष्टाची बरोबरी यंत्रांने होऊच शकत नाही. त्यामुळे आजही चांगल्या बैलजोडीची किंमत लाख ते दीड लाख रुपये असल्याचे पाहायला मिळते. काल, १६ मे रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील बैल बाजारात फेरफटका मारला असता, त्यांनाही अशा देखण्या बैलजोडीची भुरळ पडल्याचे दिसून आले.

आजकाल मेहनत करण्याची पाहिजे तशी तयारी नसणे, मजुरांची टंचाई, वाढती मजुरी यामुळे शेती मशागतीसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तसेच शेतीचे तुकडे झाल्यानेही बैलजोड्या फारच नगण्य प्रमाणात दिसतात. ३० ते ४० वर्षांपूर्वी शेतीची सर्व कामे अर्थात नांगरणी, वखरणी, पेरणी, डवरे, सऱ्या काढणे, शेतमालाची ने-आण आदी सर्व कामे बैलजोडीने करण्यात येत होती. आता मात्र महागाई असूनही काळानुसार यासाठी यंत्रांचा वापर वाढला आहे. असे असले तरी शेती व काळ्या आईवर निस्सीम प्रेम करणारे शेतकरी आपल्या खुट्यावर वहातीसाठी चांगली आणि तेवढीच देखणी बैलजोडी असावी यासाठी नेहमी आग्रही असतात. त्यामुळे चांगल्या बैलजोडीला आजही लाख ते दीड लाखांचा भाव मिळत असल्याचे दिसून येते.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी काल, १६ मे रोजी मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील बैल बाजारात फेरफटका मारला. यावेळी दोन दात, चार दात व सहा दात असलेले बैल आणि त्यांची पोत पाहताना त्यांना वेगळाच अनुभव आला. शेतकऱ्यांच्या नजरेतून चांगली बैलजोडी कशी असते, हे देखील त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि याचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी शाम पाटील, संजय सुळकर, संतोष मोहरूत, गजानन राठोड यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खरेदीदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सिद्धार्थ खरात यांना बैल बाजारात पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही वेगळाच आनंद दिसून येत होता.

Share This Article
Exit mobile version