पुण्यातील पालखी मुक्काम कायम

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदाही भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावणार

आळंदी (अर्जुन मेदनकर) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम यंदाही पूर्वीप्रमाणे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरातच राहणार असल्याची अधिकृत घोषणा आळंदी देवस्थान आणि पालखी सोहळा मालक यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक सेवा-सुविधांबाबत लेखी हमीपत्र मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

आळंदी देवस्थानच्या भक्तनिवास येथे आयोजित पत्रकार परिषदेला संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, भाऊ महाराज फुरसुंगीकर, दिंडी समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. यावर्षी श्रींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाच्या गजरात होणार आहे. त्यानंतर ९ व १० जुलै रोजी पुण्यातील भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वाढती गर्दी, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे यंदा मुक्कामाच्या जागेबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आळंदी देवस्थानला लेखी हमीपत्र देत रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण हटवणे, विद्युत खांब स्थलांतर आणि भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिकेकडून पालखी मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

रस्ते मोकळे करून भाविकांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी नवीन रस्ते तयार करण्यात आले असून, वाहतुकीस अडथळा ठरणारे वीज खांब हलविण्यात आले आहेत. पालखी मार्ग पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांनंतर आळंदी देवस्थान, पालखी सोहळा मालक, दिंडी प्रमुख आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते पुण्यातील मुक्काम पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, पुणे महानगरपालिका, पालखी विठोबा मंदिर व्यवस्थापन, दिंडी समाज संघटना आणि विविध वारकरी प्रतिनिधींनी केलेल्या समन्वयाचेही कौतुक करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बैठका, पत्रव्यवहार आणि चर्चेनंतर अखेर पुण्यातील पालखी मुक्कामाचा प्रश्न मार्गी लागल्याने वारकरी संप्रदायात समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, अपरा एकादशी निमित्त आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर हरिनाम गजरात आरती आणि तेजोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Share This Article
Exit mobile version