विना ताडपत्री धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त, आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
लोणार(वाजिद खान) : शहर आणि तालुक्यातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर सध्या विना ताडपत्री रेती वाहतूक करणाऱ्या हायवा आणि टिप्पर वाहनांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. कोणतेही सुरक्षा नियम न पाळता भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रेती रस्त्यावर सांडत असून, मागून येणाऱ्या दुचाकी चालकांच्या डोळ्यात रेतीचे कण जात असल्याने अपघातांचा धोका गंभीर बनला आहे. या वाढत्या समस्येमुळे सामान्य नागरिक, वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध आणि नियमबाह्य रेती वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. महसूल विभाग आणि आरटीओच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अनेक वाहने उघड्यावर रेती वाहतूक करत आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांमधून उडणारी रेती थेट पाठीमागील वाहनचालकांच्या डोळ्यात जात असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटून लहान-मोठे अपघात घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रस्त्यावर सांडलेल्या रेतीमुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
लोणार सरोवर परिसरात धुळीचे साम्राज्य
जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवर परिसरातूनही मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होत असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सतत उडणाऱ्या धुळीमुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवत असून पर्यटकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या सरोवर परिसरात वाढणारे हे प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे.
रात्रीच्या सुमारास वाहतुकीचा धुमाकूळ
प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी बहुतांश रेती वाहतूक रात्री आणि पहाटेच्या वेळेत होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या काळात वाहनांचा वेग अधिक अनियंत्रित असतो. काही वाहने विना नंबर प्लेट धावत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. एवढा मोठा प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः आमदार सिद्धार्थ खरात यांनी या प्रश्नावर अद्याप कोणतीही सार्वजनिक भूमिका न घेतल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासनावर ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’ केल्याचा आरोप
नियमबाह्य आणि धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या रेती वाहतुकीकडे महसूल प्रशासन आणि परिवहन विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विना ताडपत्री धावणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करून जप्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी लोणार तालुक्यातील ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

