ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बिबी मेडिकल असोसिएशन आक्रमक

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-२० मे रोजी भारत बंद आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन


बिबी (ऋषी दंदाले) :  अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या देशव्यापी आवाहनानुसार २० मे २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या “अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बिबी मेडिकल असोसिएशनच्या वतीने बिबी पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले. बिबी तसेच परिसरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेत ऑनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टल प्रणालीविरोधात आपली भूमिका मांडली.

संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात इंटरनेट फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. या संदर्भात केंद्र शासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्हा आणि लोणार तालुक्यातील सर्व औषध विक्रेते या आंदोलनात सहभागी होणार असून नागरिकांना अत्यावश्यक सेवांबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून सहकार्य केले जाईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी बिबी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारून योग्य त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Share This Article
Exit mobile version