शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक आणि गोमांस प्रकरणाचा पर्दाफाश

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ढोरा नदी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर छापा

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक आणि गोवंश जनावरांच्या गोमांस विक्रीप्रकरणी दोन मोठ्या कारवाया करत तब्बल ५ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मळेगाव शिवारातील ढोरा नदी परिसरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरीछुप्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून भागवत लक्ष्मण गर्जे (वय ४२, रा. मळेगाव, ता. शेवगाव) याला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान ५ लाख रुपये किमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर, ३० हजारांची डम्पिंग ट्रॉली आणि १० हजार रुपये किमतीची एक ब्रास शासकीय वाळू असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सम्राट अशोकनगरात गोमांस विक्रीप्रकरणी दुसरी कारवाई

यानंतर १५ मे रोजी सकाळी सम्राट अशोकनगर परिसरात एका घराच्या मागील बाजूस गोवंश जनावरांचे गोमांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून मोहंम्मद कैफ फय्याज सौदागर (वय २४, रा. सम्राट अशोकनगर, शेवगाव) याच्या घरामागील जागेची तपासणी केली असता तेथे गोवंश जनावरांचे अवशेष आणि मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २०० किलो गोमांस, धारदार सुऱ्या आणि तराजू असा ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोमांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल पंचासमक्ष नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोहेकॉ आबासाहेब गोरे आणि पोहेकॉ संदीप आव्हाड हे करत आहेत.

Share This Article
Exit mobile version