इंधन दरवाढीचा ‘भडका’! सामान्यांचे कंबरडे मोडले; पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– इंधनाचा खिसाकापू ‘स्ट्राईक’; आजपासून नवे दर लागू!
– सीएनजीही २ रुपयांनी महागला; निवडणुका संपताच ‘महागाईचा झटका’!

मुंबई/पुणे/नागपूर (धम्मप्रिया कांबळे) – गेल्या दोन वर्षांपासून स्थिर असलेल्या इंधन दरांचा संयम अखेर सुटला असून, तेल कंपन्यांनी आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ केली आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी गाठलेली शंभरी (१०० डॉलर प्रति बॅरल) यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. १५ मे पासून लागू झालेल्या या निर्णयामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

पुण्यातील पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, शहरात पेट्रोलच्या दरात ३.१६ रुपयांची वाढ झाल्याने आता एक लिटर पेट्रोलसाठी १०७.०१ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतही पेट्रोलचा दर १०६.६८ रुपयांवर पोहोचला असून डिझेलसाठी ९३.१४ रुपये खर्च करावे लागतील. विदर्भासह नागपुरातही इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला असून, तिथेही ३ रुपयांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९७.७७ रुपये तर डिझेल ९०.६७ रुपयांवर स्थिरावले आहे. केवळ पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर सीएनजीच्या दरातही २ रुपयांची वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे.

प्रमुख शहरांतील नवे दर (प्रति लिटर):

शहर पेट्रोल (₹) डिझेल (₹)
मुंबई १०६.६८ ९३.१४
पुणे १०७.०१ ९४.५०*
दिल्ली ९७.७७ ९०.६७
चेन्नई १०३.६७ ९५.२५
कोलकाता १०८.७४ ९५.१३

आंतरराष्ट्रीय बाजारात इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढण्यापूर्वी कच्चे तेल ७० डॉलर प्रति बॅरल होते, जे आता १०० डॉलरच्या पार गेले आहे. त्यातच ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधील विस्कळीत पुरवठ्यामुळे तेल कंपन्यांवर प्रचंड दबाव होता. सूत्रांच्या माहितीनुसार, जागतिक दरवाढीच्या तुलनेत ही वाढ केवळ १० टक्केच आहे. जर कच्च्या तेलाचे दर असेच चढे राहिले, तर नजीकच्या काळात आणखी दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


राजकारण तापले: ‘महागाईच्या भडक्यात घासलेट ओतले!

निवडणुका संपताच सरकारने दरवाढीचा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांनी केली आहे. “सरकारने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट (रॉकेल) ओतले आहे,” अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसने असा दावा केला आहे की, या निर्णयामुळे महागाईचा निर्देशांक वाढून देशाच्या विकास दरावर प्रतिकूल परिणाम होईल. दुसरीकडे, भाजपने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “जागतिक ऊर्जा संकट असताना विरोधक या मुद्द्याचे राजकारण करत आहेत,” असे भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटले आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात झालेली ३.५ टक्के वाढ ही अत्यंत कमी असल्याचे समर्थनही त्यांनी यावेळी केले.

Share This Article
Exit mobile version