– डिझेल टंचाईवरून शेतकरी नेते विनायक सरनाईक यांचा सरकारला खोचक टोला; तीव्र आंदोलनाचा इशारा
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता ग्रामीण भागात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. “एकीकडे शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर वाटप करून गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे खरीपाच्या तोंडावर डिझेल नाकारून शेतकऱ्यांना अडचणीत आणायचे, हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. जर सरकार डिझेल देऊ शकत नसेल, तर त्यांनी पूर्वीप्रमाणे नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सहा बैल द्यावेत,” असा खोचक सल्ला शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.
- – शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे.
- – डिझेल नसेल तर सरकारने नांगरणीसाठी सहा बैल द्यावेत.
- – मशागत खोळंबल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार.
इंधन बचतीबाबत बोलताना सरनाईक यांनी थेट सरकारलाच लक्ष्य केले. “जर खरोखरच डिझेल वाचवायचे असेल, तर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा, त्यातून मोठी बचत होईल. केवळ शेतकऱ्यांवर निर्बंध लादून काय साध्य होणार?” असेही त्यांनी नमूद केले. गेल्या आठवड्यात महसूल मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र अद्यापही प्रशासन भानावर आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात पेरणी कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विनायक सरनाईक, दासा पाटील आणि समाधान कणखर यांनी दिला आहे.

