– स्वत: उप वनसंरक्षकांची कारवाई; सॉ मिल सील करण्याची प्रक्रिया सुरू!
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली तालुक्यातील केळवद येथील ‘विश्वकर्मा सॉ मिल’वर वनविभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात सुमारे १० लाख रुपये किमतीचे अवैध सागवान, खैर आणि कडुनिंबाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सॉ मिल मालकावर वनगुन्हा दाखल करण्यात आला असून, सॉ मिल सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील काही सॉ मिलमध्ये वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे लाकडाची कटाई केली जात असल्याची गोपनीय माहिती उप वनसंरक्षक जमीर शेख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शेख यांनी पथकासह १२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास केळवद येथील विश्वकर्मा सॉ मिलवर अचानक धाड टाकली. छाप्यादरम्यान सॉ मिलच्या परिसरात झाडाझडती घेतली असता, मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूड साठा आढळून आला. यामध्ये सागवानाचे ३.५६५ घनमीटर (६७ नग) ज्याची किंमत २ लाख ५१ हजार ५७८ रुपये, साग चौरसाचे १०१ नग (अंदाजे किंमत ५ लाख रुपये) आणि इतर प्रजातींच्या लाकडांचा समावेश आहे. एकूण १० लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. या लाकडांबाबत सॉ मिल मालक संजय शर्मा यांच्याकडे वैध परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेले लाकूड बुलढाणा येथील शासकीय लाकूड आगारात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी सॉ मिल मालक संजय शर्मा यांच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या उपस्थितीत पार पडली. या मोहिमेत वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक समाधान झोटे, गजानन शिंदे, नितेश गवई, सरोदा कराड, विक्रम राऊत, वाहन चालक संदीप मडावी आणि वनमजूर दीपक सोनवणे, रवींद्र तायडे, अमोल चव्हाण, पवन वाघ, आकाश शिरसाट, अंकुश गायकवाड व पवन गायकवाड यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे करत आहेत.

