शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळावे; भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण; प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र, पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, सुरक्षेचे कारण पुढे करून अनेक पेट्रोल पंप चालक वाहनांच्या टाकीतच डिझेल भरत आहेत. त्यामुळे शेतात काम करणारे ट्रॅक्टर पंपापर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. अनेक गावांमधून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन पंपावर जाण्यासाठी दोन ते तीन तास खर्च करावे लागत असून त्यामुळे शेतीची कामे खोळंबत आहेत. वेळेत मशागत न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची आरसी बुक दाखवल्यानंतर दररोज किमान तीन हजार रुपयांपर्यंतचे डिझेल कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच नाफेड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होत असल्याने वाहतुकीसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना यासंदर्भात लेखी आदेश देऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. “शेती हा राज्याचा कणा असून शेतकरी जगला तर देश जगेल. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील, उपाध्यक्ष विशाल विसपुते, नीरज गायकवाड, बंडूभाऊ अंभोरे, वैभव लाड, पंढरीभाऊ गावंडे, दत्ताभाऊ शेवाळे, पंजाबराव देशमुख, सतीश गावंडे, दीपक पाटील भाकडे, वसुदेव राजपूत, फकीर कराडे, निलेश मुठ्ठे, अजय खराटे, करण बेंडवाल, प्रतीक गायकवाड, कार्तिक गावडे, मंगल वाघमारे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version