-नगर प्रदक्षिणेदरम्यान भक्तिमय वातावरण; शेकडो भाविकांनी घेतले दर्शन
देऊळगाव कुंडपाळ (वाजिद खान) : लोणार तालुक्यात प्रथमच पंचमुखी हनुमानाची भव्य मूर्ती साखर तळे संस्थानात विराजमान करण्यात आली असून या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मूर्ती आगमनानंतर गावातून नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी हनुमान चालीसा, भजने आणि भक्तिगीतांच्या गजरात शेकडो भाविकांनी पंचमुखी हनुमानाचे दर्शन घेतले.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजस्थान येथून आणण्यात आलेली ही १३०० किलो वजनाची भव्य मूर्ती साखर तळे संस्थानात दाखल झाली. स्थानिक भूमिपुत्र सैनिक विठ्ठल नामदेव सरकटे यांनी तब्बल १ लाख ५१ हजार रुपये खर्च करून ही मूर्ती संस्थानासाठी आणली आहे. मूर्ती आगमनावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मठाचे मठाधिपती साधन चैतन्य स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. नगर प्रदक्षिणेदरम्यान ठिकठिकाणी पूजन करण्यात आले तसेच भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. पंचक्रोशीत प्रथमच पंचमुखी हनुमानाची मूर्ती विराजमान झाल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी मूर्तीदाता विठ्ठल नामदेव सरकटे, साधन चैतन्य स्वामी महाराज, गजानन डव्हळे, दीपक सरकटे, विष्णू सरकटे, योगेश सरकटे, रवी सरकटे, अनंता सरकटे, चैतन्य सरकटे, परमेश्वर काकडे, सतीश भुसारे, विजू वायाळ, समाधान नरवाडे, नायबराव बापू सरकटे यांच्यासह मोठ्या संख्येने देवीभक्त उपस्थित होते. दरम्यान, विठ्ठल नामदेव सरकटे यांनी यापूर्वीही देवी संस्थानाला ५० किलो वजनाची आणि ५१ हजार रुपये किमतीची पंचधातूची घंटा अर्पण केली होती. साधन चैतन्य स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातन जागृत साखर तळे देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून या कार्यासाठी देवीभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

