-दिवसभराच्या मोहिमेनंतर फक्त एका वाहनावर कारवाई; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
लोणार (वाजेद खान) : लोणार तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात तहसीलदार भूषण पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई मोहीम राबवली. मात्र दिवसभर चाललेल्या या मोहिमेनंतर महसूल विभागाच्या हाती केवळ एकच वाहन लागल्याने संपूर्ण कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होत असताना प्रशासनाला फक्त एकाच वाहनावर दंडात्मक कारवाई करता आली, यामुळे नागरिकांमध्ये उलट चर्चा रंगू लागली आहे.
तालुक्यातील विविध भागांतून अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने तहसीलदार भूषण पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांसह मुख्य मार्गांवर नाकाबंदी केली होती. शासकीय वाहनांचा ताफा आणि महसूल विभागाची हालचाल पाहून मोठ्या प्रमाणावर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र दिवसभरानंतर महसूल विभागाने केवळ एका ट्रकवर कारवाई केल्याचे समोर आले आणि त्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले. स्थानिकांच्या मते, ज्या मार्गावर महसूल विभागाचे पथक तैनात होते, त्याच मार्गावरून दररोज शेकडो रेतीचे ट्रक ये-जा करतात. अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेत असल्याच्या तक्रारीही सातत्याने होत असतात. असे असताना संपूर्ण दिवसभरात केवळ एकच वाहन दोषी आढळणे अनेकांना संशयास्पद वाटत आहे. काही नागरिकांनी ही कारवाई केवळ दिखावा असल्याची टीका केली असून उर्वरित वाहनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, “एका वाहनावर कारवाई करण्यासाठी दिवसभर प्रशासनाला उन्हात उभे राहण्याची वेळ का यावी?” असा उपरोधिक प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. या कारवाईच्या आडून इतर वाहनांना मोकळा मार्ग देण्यात आला का, अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेती माफियांना कोणताही धक्का बसलेला दिसत नसल्याची प्रतिक्रिया देखील उमटत आहे. महसूल विभागाच्या या मोहिमेबाबत आता वरिष्ठ स्तरावरून पारदर्शक चौकशी करण्याची मागणी होत असून, अवैध रेती वाहतुकीविरोधात खरोखर कठोर कारवाई होणार की अशाच प्रतीकात्मक मोहिमा सुरू राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

