सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे; २७ गावांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

आळंदी (अर्जुन मेदनकर) : औंढा नागनाथ तालुक्यातील केळी पाझर तलावात सिद्धेश्वर धरणाचे पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी गोळेगाव कालव्यात उतरून लक्षवेधी जलसमाधी आंदोलन केले. अनेक दिवसांपासून शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून हिंगोली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्यासाठी परिसरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. विविध निवेदने देऊनही प्रश्न कायम राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरातील तब्बल २७ गावांतील शेतकरी सिंचनाच्या पाण्याअभावी अडचणीत सापडले असून शेती व्यवसाय संकटात आला आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

जलसमाधी आंदोलनादरम्यान शेतकरी थेट कालव्यात उतरल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही आंदोलनस्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी हिंगोली पाटबंधारे विभागाचे अभियंता पत्की यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. या आंदोलनात एकनाथ नागरे, गंगाधर घुगे, बालाजी सांगळे, संतोष मोरगे, अमोल सांगळे, भास्कर आघाव, प्रल्हाद गिते, गजानन कुटे, निवास पाटील, निवास घुगे, सोपान आघाव, शुभम सांगळे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Share This Article
Exit mobile version