लोणार-मंठा रोडवर ओव्हरटेकिंगच्या नादात अपघात; रेती टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-गणपती मंदिराजवळ घडली घटना; अतिवेग आणि बेजबाबदार वाहतुकीवर नागरिकांचा संताप

लोणार (प्रतिनिधी) : लोणार-मंठा मार्गावरील गणपती मंदिराजवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओव्हरटेकिंगच्या नादात एका रेती टिप्परने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणारकडे जाणारा एक दुचाकीस्वार समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्यासाठी गणपती मंदिराजवळ आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून थांबला होता. रस्ता अरुंद असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याने दुचाकी डांबरी रस्त्याखाली घेतली होती. त्याचवेळी लोणारहून मंठ्याकडे जाणाऱ्या एका रेती टिप्पर चालकाने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या घाईत नियंत्रण गमावले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.

घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला मदत केली. यावेळी एका जागरूक नागरिकाने संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले असून त्यामुळे अपघाताचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराच्या पायाला मुका मार लागला असून मोठी दुर्घटना टळल्याने त्याने अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेमुळे लोणार-मंठा मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर अवजड रेती टिप्परची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक चालक अतिवेगाने आणि बेजबाबदारपणे वाहने चालवत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अशा प्रकारच्या धोकादायक ओव्हरटेकिंगमुळे निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने या मार्गावरील अवैध रेती वाहतूक, अतिवेग आणि नियमभंग करणाऱ्या चालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version