सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे; जनरेटर बंद असल्याने नागरिकांची तारांबळ

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वीजपुरवठा खंडित, अधिकारी अनुपस्थित; तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनेक वर्षांपासून बंद पडलेली जनरेटर व्यवस्था आणि तहसीलदारांसह अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून तहसील कार्यालयाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

सिंदखेडराजा तालुक्याचा विस्तार मोठा असून तो पाच जिल्हा परिषद गट आणि सात मंडळांमध्ये विभागलेला आहे. साखरखेर्डा, शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा यांसारख्या दूरवरच्या भागांतील नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र, अनेकदा अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगितले जाते, तर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नेटवर्क सेवा बंद पडून संपूर्ण कामकाज ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विशेषतः पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. रेशन कार्डातून नाव कमी करणे, नवीन नाव समाविष्ट करणे यांसारखी कामे अनेक वर्षांपासून रखडलेली असून “अर्थपूर्ण व्यवहाराशिवाय काम होत नाही,” असा आरोप काही नागरिकांनी केला आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही नागरिक तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांकडून कोणतीही संवेदनशीलता दाखवली जात नसल्याचा आरोप होत आहे. काही कर्मचारी गैरहजर असतात, तर काही अधिकारी दौऱ्यावर असल्याने कामकाज विस्कळीत होत आहे. कार्यालयातील वीज नसल्याने संगणकीय सेवा बंद पडतात आणि दिवसभर अनेक विभागांमध्ये कामकाज ठप्प राहते.

तहसील कार्यालयाच्या परिसरात आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून आले. विशेषतः संजय गांधी निराधार विभागासमोर अनेक वयोवृद्ध महिला ताटकळत बसलेल्या होत्या. दरम्यान, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेले मोठे जनरेटर गेल्या तीन-चार वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाकडून लाखो रुपये खर्च करूनही केवळ जनरेटर दुरुस्त नसल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प राहत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “जनतेची रखडलेली कामे कधी मार्गी लागणार? जनरेटर दुरुस्ती कधी होणार?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून तहसील प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Share This Article
Exit mobile version