लोणार पोलिसांची धडाकेबाज कारवाई

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-महिलेचा चेहरा वापरून अश्लील व्हिडिओ प्रसारित करणारा आरोपी जेरबंद

लोणार (वाजिद खान) : महिलेचा चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सॲपद्वारे प्रसारित करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाला लोणार पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून सायबर गुन्हे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीबी (जि. बुलढाणा) येथील एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, तिच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील व्हिडिओ आणि फोटो तयार करण्यात आले होते. आरोपीने हे व्हिडिओ संबंधित महिलेसह गावातील इतर महिलांना व्हॉट्सॲपवर पाठवले होते. तसेच आपली ओळख लपवून महिलांना नग्न व्हिडिओ कॉल केल्याचाही प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महिलेच्या तक्रारीनंतर लोणार पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. सायबर तपासाच्या आधारे पोलिसांनी रवि गजानन वायाळ (वय २१, रा. खळेगाव, ता. लोणार) याला निष्पन्न करून ८ मे २०२६ रोजी अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे २० हजार ५०० रुपये किमतीचा ‘One Plus’ कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर) श्री. संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस कर्मचारी गणेश लोढे, अनिल शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तर सायबर सेलचे राजू आडवे आणि पवन मखमले यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

Share This Article
Exit mobile version