लोणार रेशन गोदामाचा सावळा गोंधळ; बंदच्या कारणावर प्रशासनातच विसंगती

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-‘हमालांचा संप’ की ‘कर्मचारी आजारी’? नागरिक संभ्रमात

लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यातील शासकीय रेशन गोदाम आज दिवसभर बंद राहिल्याने स्वस्त धान्य दुकानदारांसह लाभार्थी नागरिकांचे मोठे हाल झाले. गोदामाला कुलूप असल्याने अनेकांना धान्य वितरणाबाबत अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, गोदाम बंद असण्याचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माहिती दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोदाम बंद का ठेवण्यात आले, याबाबत विचारणा केली असता निरिक्षण अधिकारी आरती दांडगे यांनी “संपूर्ण जिल्ह्यातील रेशन गोदामांवरील हमालांचा संप सुरू असल्यामुळे कामकाज ठप्प आहे,” अशी माहिती दिली. त्यामुळे जिल्हास्तरावरील संपामुळेच गोदाम बंद असल्याचे स्पष्ट होत होते. मात्र, याच विषयावर तहसीलदार भूषण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेगळेच कारण सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “गोदामाचा अतिरिक्त कार्यभार कालच आवारे साहेबांकडे सोपवण्यात आला होता. मात्र ते आज अचानक आजारी पडल्याने गोदामाचे कामकाज सुरू होऊ शकले नाही.”

एकाच कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दोन वेगवेगळी कारणे सांगितली गेल्याने प्रशासनाच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमके कारण कोणते, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून प्रशासनातील विस्कळीत कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रेशन धान्य वितरणात विलंब झाल्यास त्याचा थेट फटका गरीब व गरजू लाभार्थ्यांना बसू शकतो. त्यामुळे वरिष्ठ जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ परिस्थिती स्पष्ट करावी तसेच रेशन गोदामाचे कामकाज नियमित सुरू करावे, अशी मागणी लोणारकरांकडून होत आहे.

Share This Article
Exit mobile version