-आयुष सुरुशे ठरला अव्वल; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जानकीदेवी माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या निकालात पुन्हा एकदा उत्कृष्ट यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्तेच्या बाबतीतही विद्यालयाने नवा उच्चांक स्थापित केला आहे.
यंदा विद्यालयातून १२२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी २५ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्के गुण मिळवत विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली, तर ९७ विद्यार्थ्यांनी ७५ ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळवत प्राविण्य श्रेणीत यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
विद्यालयातील आयुष प्रकाश सुरुशे याने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. भाविका राजीव थुट्टे, कु. जिजाऊ कैलास घुबे आणि स्वराज सिद्धेश्वर टेकाळे यांनी प्रत्येकी ९३ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. कु. कांचन चित्रे आणि तृप्ती मानघाले यांनी ९२.२०, प्राची गायकवाड हिने ९२, पायल थुट्टे हिने ९१.२०, आरती सोनुने हिने ९०.८०, तर उदयराज झगडे, साई कुटे आणि संगीता घुबे यांनी प्रत्येकी ९०.६० टक्के गुण मिळवले. सोहम उगले आणि निर्मल नित्यानंद यांनी ९०.४० टक्के गुण मिळवत विद्यालयाचा गौरव वाढविला आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे जानकीदेवी विद्यालयाचा निकाल चिखली तालुक्यातील सर्वोत्कृष्ट निकालांपैकी एक ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यालयाचे संस्थाध्यक्ष शेनफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धव घुबे तसेच प्राचार्य हरिदास घुबे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शिक्षकांच्या परिश्रमाचेही कौतुक केले आहे.

