-श्री शिवाजी हायस्कूलचा १०० टक्के निकाल; साखरखेर्ड्याने कायम राखला शैक्षणिक दबदबा
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही साखरखेर्डा शहराने आपला शैक्षणिक दबदबा कायम राखला आहे. एस ई एस हायस्कूलची विद्यार्थिनी प्रिती नकुल सिरसाठ हिने तब्बल ९९.६० टक्के गुण मिळवत संपूर्ण मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एस ई एस हायस्कूलमधील गौरी शत्रुघ्न तुपकर हिने ९८.८० टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान पटकावले, तर प्रगती गोपीनाथ राऊत, स्नेहा संदीप रणमळे आणि आरुषी गणेश कठाळे या तिघींनी समान ९७.४० टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले. भाग्यश्री विजय मंडळकर हिने ९७.२०, गौरी विजय जाधव हिने ९७, पूजा विष्णू थुट्टे हिने ९६.२० तर आदित्य राजू निकम आणि ऋतुजा पंचाळ यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही एस ई एस हायस्कूल, जिजामाता विद्यालय आणि श्री शिवाजी हायस्कूल यांच्यात निकालाची चुरस पाहायला मिळाली. कधी शिवाजी हायस्कूल, तर कधी जिजामाता विद्यालय आणि एस ई एस हायस्कूल तालुक्यात अव्वल ठरत असल्याने साखरखेर्ड्याचा “शिक्षण पॅटर्न” पुन्हा अधोरेखित झाला आहे. सहकार विद्या मंदिर आणि अनिकेत सैनिक स्कूलही परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जात आहेत.
श्री शिवाजी हायस्कूलचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून १४० विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, २५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. या विद्यालयातील मयुर देशमुख याने ९७ टक्के, योगेश काळे याने ९६.६०, पल्लवी रिंढे हिने ९६.२०, विराज विष्णू बेंडमाळी याने ९६ आणि भाग्यश्री समाधान कंकाळ हिने ९५ टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे. जिजामाता विद्यालयाचाही निकाल उल्लेखनीय ठरला असून विद्यालयाचा एकूण निकाल ९९.८० टक्के लागला आहे. या विद्यालयातील अंजली जाधव हिने ९५.६०, योगीता खरात हिने ९५.४० तर सुरज कठाळे याने ९५ टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले आहे. विद्यालयातील १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ११० विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, ३३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ११ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर एका विद्यार्थ्याने उत्तीर्ण श्रेणी मिळवली आहे. यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात साखरखेर्ड्याचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.

