दहा वर्षांचा वाद संपला; ३ किमी शेतरस्ता अखेर खुला

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-पोलीस बंदोबस्तात कारवाई; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अंकुश पाटील (चिखली) : तालुक्यातील भरोसा येथील खडक डोह परिसरातील तब्बल दहा वर्षांपासून वादात अडकलेला शेतरस्ता अखेर प्रशासनाच्या पुढाकाराने खुला करण्यात आला. सुमारे ३ किलोमीटर लांबीचा आणि १२ फूट रुंदीचा हा रस्ता खुला झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शेतरस्ते खुली करण्याच्या मोहिमेमुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. चिखली तहसील कार्यालयावरील कामाचा ताण लक्षात घेऊन या प्रकरणाची जबाबदारी नायब तहसीलदार एच. डी. वीर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांनी दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये संवाद घडवून आणत सामंजस्याने हा प्रश्न सोडवला. गट क्रमांक ३३३ ते २३९ दरम्यान जाणारा हा शेतरस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ५ मे रोजी पोलीस बंदोबस्तात दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संवादातून मिटला दीर्घकालीन वाद

तहसील प्रशासनाने थेट घटनास्थळी जाऊन दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना एकत्र आणले. कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नायब तहसीलदार वीर यांनी संयमाने मार्गदर्शन करत संवादातून तोडगा काढला. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तात्काळ मोकळा करण्यात आला.


शेतरस्त्यामुळे शेतीला नवे बळ

शेतरस्ता हा शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा मानला जातो. पेरणी, खत टाकणे, फवारणी, कापणी तसेच उत्पादन बाजारात नेण्यासाठी योग्य रस्ता असणे अत्यंत गरजेचे असते. रस्ता नसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. भरोसा येथील हा रस्ता खुला झाल्याने आता शेतीसाठी वाहतूक सुलभ होणार असून खर्चात बचत होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणेही सोपे होणार आहे.

Share This Article
Exit mobile version