अमडापूर येथे कृषी विभागामार्फत हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

खरीपपूर्व मार्गदर्शन सभेत कीड नियंत्रण, बीज प्रक्रिया व नैसर्गिक शेतीवर भर

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : तालुक्यातील अमडापूर येथे दि. ६ मे २०२६ रोजी कृषी विभागामार्फत खरीपपूर्व मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली. येणाऱ्या खरीप हंगामातील विविध पिकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषत: सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले.

मागील वर्षी चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने तिच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी योगेश सरोदे यांनी हुमणी अळीचे जीवनचक्र, खाण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत लाईट ट्रॅप घरगुती पद्धतीने कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सध्या हुमणी अळी कोष अवस्थेत जमिनीत असून पहिल्या पावसानंतर भुंगेऱ्यांच्या रूपात बाहेर येते व बोर, बाभूळ, कडुलिंब यांसारख्या झाडांच्या पानांवर उपजीविका करते. त्यामुळे या झाडांची छाटणी करणे, आवश्यक असल्यास कीटकनाशक फवारणी करणे तसेच लाईट ट्रॅपच्या सहाय्याने भुंगेरे पकडून नियंत्रण करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

नैसर्गिक शेतीसाठी डी-कंपोजर, एस-९ कल्चर, बायोडायनॅमिक कंपोस्ट, जीवामृत, बीजामृत यांसारखी तरल खते कमी खर्चात कशी तयार करावी याबाबत आत्मा विभागाचे निसार खान व योगेश सोनवणे यांनी माहिती दिली. यावेळी खरीप हंगामासाठी बीज उत्पादन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी वैयक्तिक व गटासाठी बियाण्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बियाण्यांची उगवण शक्ती तपासणी व बीज प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या कार्यशाळेस कृषी अधिकारी योगेश सरोदे, काशिनाथ पवार, विजय सिंग ठाकूर, निसार खान, निकिता पिंजरकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version