-उर्मी संस्थेचा उपक्रम; ग्रामस्थांच्या सहभागातून रात्रीच्या वर्गांना मिळाला प्रकाश
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : उर्मी संस्थेच्या माध्यमातून खेड आणि मावळ तालुक्यातील गाव व वाडी-वस्तीवर साक्षरता वर्ग चालविले जातात. हे वर्ग मुख्यत: रात्रीच्या वेळी भरतात. मात्र अनेक ठिकाणी विजेची समस्या असल्याने वर्गासाठी येणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही समस्या लक्षात घेऊन उर्मी संस्थेच्या वतीने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून सौर पथदिवे बसविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. खेड तालुक्यातील कोये आणि कुरकुंडी गावातील ठाकर वस्तीवर सौर दिवे उपलब्ध करून देण्यात आले असून ग्रामस्थांनी स्वतः खांब उभारून दिवे बसविण्याचे काम केले. या सौर दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी पुरेसा उजेड उपलब्ध होत असून साक्षरता वर्ग सुरळीतपणे पार पडत आहेत. तसेच ग्रामस्थांनाही या दिव्यांचा दैनंदिन वापरासाठी लाभ होत आहे. या उपक्रमासाठी कुरकुंडी येथील मायाताई जावळे आणि कोये येथील हौसाताई डांगले यांनी विशेष पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे साक्षरता वर्गातील उपस्थिती वाढली असून नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.