– शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला यश
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी-वडगाव रस्त्यावरील साई गार्डन मंगल कार्यालयाच्या दक्षिणेकडील पाईप कंपनीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुधवारी दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास लागलेली ही आग काही वेळातच भडकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए तसेच चाकण नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. पोलिस प्रशासनालाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला.
दरम्यान, आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी दुरुस्तीसाठी दिल्यामुळे तत्काळ मदत पोहोचण्यात अडचणी आल्याचे समोर आले. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा कायम कार्यरत व अद्ययावत ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत आळंदी परिसरात तीन आगीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना बळकट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.

