शिंग्रोबा धनगरांच्या बलिदानाची दखल घ्या; महामार्गाला त्यांचे नाव द्या

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-भाजपा नेते विनोद वाघ यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

दुसरबीड (तालुका प्रतिनिधी) : पुणे–मुंबई दरम्यान सुरू असलेल्या मिसिंग लिंक महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीमुळे राज्यात पुन्हा एकदा ऐतिहासिक वारसा आणि हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

विनोद वाघ यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ब्रिटिश राजवटीच्या काळात शिंग्रोबा धनगर यांनी देशहितासाठी मोठे योगदान दिले. सातारा जिल्ह्यात जन्मलेले शिंग्रोबा धनगर हे बोरघाट परिसरात मेंढपाळ म्हणून वास्तव्यास होते. त्या काळात मुंबई–ठाणे रेल्वेमार्गाचा विस्तार पुण्यापर्यंत करण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून योग्य मार्ग शोधणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत होते. अशा परिस्थितीत शिंग्रोबा धनगर यांनी आपल्या स्थानिक ज्ञानाच्या जोरावर घाटातून मार्ग कसा काढता येईल हे इंग्रजांना दाखवून दिले. त्यांच्या या योगदानामुळेच पुढील वाहतूक आणि दळणवळण सुलभ होण्यास मदत झाली, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

वाघ यांनी पुढे म्हटले आहे की, इंग्रजांनी शिंग्रोबांना त्यांच्या मदतीबद्दल बक्षीस देऊ केले असता, त्यांनी “माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या” अशी मागणी केली. या धाडसी उत्तरामुळे संतप्त झालेल्या इंग्रजांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे शिंग्रोबा धनगर हे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर देशासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. ज्या ठिकाणी शिंग्रोबा धनगर यांची हत्या करण्यात आली, त्या ठिकाणी १९२९ साली स्मारक उभारण्यात आले असून आजही तेथे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. धनगर समाजात त्यांना आधुनिक दैवताचा मान दिला जातो, असेही वाघ यांनी नमूद केले आहे.

राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे–मुंबई मिसिंग लिंक महामार्गाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देणे ही त्यांच्या बलिदानाची खरीखुरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल आणि समाजात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विनोद वाघ यांनी व्यक्त केली असून, या विषयावर लवकरच निर्णय होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Exit mobile version