बारामतीत सुनेत्रा पवारांचा ‘विक्रमी’ गुलाल; २.१८ लाखांच्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– राहुरीत अक्षय कर्डिलेंचा दणदणीत विजय; पोटनिवडणुकीत ‘महायुती’चे वर्चस्व!

बारामती/अहिल्यानगर (सोनल बडगुजर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार मतांचे महाप्रचंड मताधिक्य घेत विरोधकांचे डिपॉझिट जप्त केले. या विजयामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावावर देशातील आणि राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवला गेला असून, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातही भाजपने आपला गड राखला असून, अक्षय कर्डिले यांनी १ लाख १२ हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला होता, मात्र त्यावेळी विजयाचे अंतर साधारण १ लाखाच्या आसपास होते. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. एकूण ३ लाख ८३ हजार ७६७ मतदारांपैकी बहुतांश मतदारांनी सुनेत्रा पवारांच्या पारड्यात कौल दिला. “हा विजय माझा नसून बारामतीकरांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन,” अशी भावना सुनेत्रा पवार यांनी विजयानंतर व्यक्त केली.


राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून स्विकारले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

राहुरीत अक्षय कर्डिलेंचा वारसा कायम!

राहुरी मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या ठिकाणी २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यांचे वारसदार अक्षय कर्डिले यांनी १ लाख १२ हजार ५८७ मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. कर्डिले कुटुंबाचा या मतदारसंघातील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

या दोन्ही मतदारसंघांतील निकाल महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक मानले जात आहेत. विशेषतः बारामतीमधील विक्रमी मताधिक्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शक्ती प्रदर्शनावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने आगामी राजकारणात महिला नेतृत्वाचा दबदबा वाढण्याची चिन्हे आहेत.

Share This Article
Exit mobile version