-भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम; गुणवंतांचा गौरव व भाविकांसाठी पाणी-टोपी वाटप
चाकण (अर्जुन मेदनकर) : चाकण शहरातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकण नगरपरिषदेच्या वतीने यावर्षी (२०२६) गुणवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक दायित्व जपत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

यात्रेदरम्यान वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने भाविकांसाठी मोफत पाणी वाटप आणि टोपी वाटप असे दोन महत्त्वाचे उपक्रमही राबवले. शहरातील प्रमुख ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, तसेच उन्हापासून संरक्षणासाठी भाविकांना टोपींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांचे भाविकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत करत समाधान व्यक्त केले. सन्मानित व्यक्तींनीही या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा कार्यक्रमांचे अधिक व्यापक आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. युवा पिढीला समाजकार्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. चाकण नगरपरिषदेने या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा आदर्श निर्माण केला आहे.

