पुणे: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणाचा तपास आता ‘एसआयटी’कडे; नराधमाच्या विकृतीचा थरार समोर!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– राष्ट्रीय महिला आयोगाकडून स्वेच्छा दखल; नराधमाला फाशी देण्याची जनभावना
– विकृतीचा कळस: कोंबड्या, कुत्रे आणि शेळ्यांसारख्या प्राण्यांवरही लैंगिक अत्याचार!

पुणे (सोनाली बडगुजर) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाच्या कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि जनसामान्यांमधील तीव्र संताप लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) या घटनेची ‘सु मोटो’ दखल घेत केंद्र स्तरावरून देखरेख सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या नराधमाने केवळ मानवावरच नव्हे, तर कोंबड्या, कुत्रे आणि शेळ्यांसारख्या प्राण्यांवरही लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

संतप्त पुणेकरांच्या रस्ता रोकोमुळे बेंगळुरू-मुंबई द्रूतगती महामार्ग ठप्प पडला होता.

पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या एका चार वर्षांच्या मुलीला, घरासमोर खेळत असताना भीमराव कांबळे या ६५ वर्षीय नराधमाने ‘वासरू दाखवतो’ असे आमिष दाखवून गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा नराधम मुलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी रात्री पुण्यातील नवले पुलावर नागरिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

राज्य सरकारने लोकभावना आणि प्रकरणाची संवेदनशीलता पाहून सहा अधिकाऱ्यांच्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी या पथकाचे नेतृत्व करतील. इतके भयंकर कृत्य करूनही आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, “ही मारामारीची किरकोळ केस आहे,” असे उत्तर देऊन त्याने न्यायाधीशांनाही चक्रावून सोडले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वीही त्याने दोनदा अशा प्रकारचे कृत्य केले होते, परंतु पुराव्याअभावी तो सुटला होता.

शनिवारी रात्री चिमुरडीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आम्हाला भेटायला येऊ नये, त्यांनी फोटो काढून राजकारण करू नये,” अशी संतप्त आणि भावनिक भूमिका पीडितेच्या वडिलांनी घेतली आहे.

तपासादरम्यान भीमराव कांबळे याच्या विकृतीचे अनेक पदर समोर आले आहेत. त्याने केवळ मानवावरच नव्हे, तर कोंबड्या, कुत्रे आणि शेळ्यांसारख्या प्राण्यांवरही लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या या राक्षसी स्वभावामुळे साळवडे ग्रामपंचायतीने २० वर्षांपूर्वीच ठराव करून त्याला गावातून हाकलून दिले होते. राष्ट्रीय महिला आयोगाने ‘नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’ (NCPCR) कडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला असून पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

Share This Article
Exit mobile version