कंडारीचे माजी सरपंच शिवाजी कायंदे यांचे हृदयविकाराने निधन; जनसेवेसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी हरपला!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– कंडारी परिसरात शोककळा; ५ मे रोजीच्या आंदोलनापूर्वीच काळाचा घाला!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : साखरखेर्डा-शेंदुर्जन जिल्हा परिषद सर्कलमधील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि कंडारीचे माजी सरपंच शिवाजी माधवराव कायंदे (वय ५७) यांचे रविवारी (ता. २) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सतत प्रशासनाशी झुंजणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनामुळे कंडारीसह परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.

शिवाजी कायंदे हे माजी जिल्हा परिषद सदस्य बद्रीभाऊ वाघ यांचे भाचे म्हणून परिसरात परिचित होते. सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला होता. विशेषतः शेंदुर्जन-जागदरी-कंडारी-भंडारी-खळेगाव या रस्त्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी बस सुरू व्हावी, यासाठी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.


आंदोलनाची तयारी अपूर्णच राहिली!

एसटी बस सुरू करण्याबाबत प्रशासन टाळाटाळ करत असल्याने, कायंदे यांनी येत्या ५ तारखेला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. १ मे रोजी त्यांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्जही केला होता. मात्र, हे आंदोलन होण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.


लग्नासाठी गेले अन् काळ आला ! शनिवारी (ता. २) दुसरबीड येथे एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी ते गेले होते. तेथे मुक्काम केल्यानंतर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आज दुपारी ४ वाजता कंडारी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, शिवराज कायंदे, माजी जि.प. सदस्य बद्रीभाऊ वाघ, माजी सभापती रंगनाथ डोईफोडे, शिक्षक नेते अशोक उगलमुगले, अविनाश नागरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अस्थींचे विसर्जन बुधवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता कंडारी येथे होणार आहे.

Share This Article
Exit mobile version