– नायगाव देशमुख येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या स्वप्नांचा आगीत कोळसा!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील नायगाव देशमुख येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या स्वप्नांचा आगीत कोळसा झाला आहे. देऊळगाव साकरशा शिवारात लागलेल्या भीषण आगीत गजानन सूर्यभान पारधी या शेतकऱ्याचे साडेतीन एकरातील कांदा बियाणे (टोळ कांदा) जळून खाक झाले. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्याचे सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, ऐन काढणीच्या हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कडक उन्हामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि पाहता पाहता संपूर्ण कांदा बी जळून खाक झाले. या आगीत साडेतीन एकरातील उत्पादनाचे पूर्णतः नुकसान झाले असून, सहा लाखांचा फटका बसला आहे. हतबल झालेल्या पारधी यांनी शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भास्कर ठाकरे यांनी तहसीलदार निलेश मडके, महसूल अधिकारी बालाजी माने आणि कृषी विभागाशी संपर्क साधून तातडीने मदतीची सूचना केली. याबाबत माहिती देताना ग्राम महसूल अधिकारी बालाजी माने यांनी सांगितले की, “नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्यात येईल आणि त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

