महाराष्ट्र दिनी रस्ता खुला; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

– किन्ही सवडत ते निमखेड धरण पांदण रस्ता अखेर खुला; १६ शेतकऱ्यांना दिलासा

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रशासनाने लोकाभिमुख कामाचा आदर्श घालत किन्ही सवडत येथील प्रलंबित पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. किन्ही सवडत ते निमखेड धरण हा रस्ता अनेक दिवसांपासून रखडला होता. मात्र उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय सवडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोडवण्यात आला.

तहसील प्रशासन, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आणि रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सुमारे ३ किमी लांबीचा हा रस्ता खुला झाल्याने तब्बल १६ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या वेळी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, मंडळ अधिकारी एम.पी. सवडतकर, ग्राम महसूल अधिकारी गीते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक करत आभार व्यक्त केले. “चिखली पॅटर्न” अंतर्गत रस्ते खुले करण्याची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आमचा निर्धार आहे, असे तहसीलदार विजय सवडे यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनी घेतलेला हा निर्णय केवळ रस्ता खुला करणारा नसून प्रशासन आणि जनतेतील विश्वास अधिक दृढ करणारा ठरला आहे.

Share This Article
Exit mobile version