– किन्ही सवडत येथील १६ शेतकऱ्यांचा वनवास संपला; तहसीलदारांनी बांधावरच निकाली काढला प्रलंबित प्रश्न!
चिखली (अंकुश पाटील) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत चिखली महसूल प्रशासनाने ‘लोकाभिमुख’ कारभाराचा एक आदर्श वस्तुपाठ समोर ठेवला आहे. मौजे किन्ही सवडत येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न थेट बांधावर जात मार्गी लावण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे ३ किलोमीटरचा रस्ता खुला झाला असून, परिसरातील १६ शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
तहसील प्रशासन, महसूल कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेनंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. “प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आमचा अनेक वर्षांचा वनवास संपला,” अशा भावना लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या मोहिमेवेळी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, मंडळ अधिकारी एम. पी. सवडतकर, ग्राम महसूल अधिकारी गीते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी ‘चिखली पॅटर्न’ अंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याची मोहीम हाती घेतली आहे. येत्या काळात तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मोहिमेतून दिलासा देण्याचा आमचा निर्धार आहे.” — विजय सवडे, तहसीलदार, चिखली
महाराष्ट्र दिनी केवळ शासकीय सोहळ्यांपुरते मर्यादित न राहता, प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे. हा रस्ता केवळ शेतीसाठी नसून प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचा मार्ग ठरल्याची चर्चा परिसरात आहे.

