चिखलीतील पाणीपुरवठा कामात हलगर्जी नको; नियोजित वेळेत आणि दर्जेदार कामाचे आ. श्वेताताई महालेंचे प्रशासनाला सक्त निर्देश!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– अमृत २.० व नगरोत्थान अभियानाचा घेतला आढावा; त्रुटी दूर करून नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना!

चिखली (अंकुश पाटील) : शहरातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांवर प्रभावी नियंत्रण ठेवून ती विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा. खोदकाम, पाईपलाईन आणि रस्ते पॅचिंगच्या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत चिखली नगर परिषदेतील आढावा बैठकीत प्रशासनाला आणि ठेकेदारांना चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आज (दि. २ मे) सक्त ताकीद दिली.

केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत २.०’ आणि राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान’ अंतर्गत शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी चिखली नगर परिषदेत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विकासकामांचा दर्जा आणि नागरिकांना होणारा त्रास या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आ. श्वेताताई महाले पाटील यांनी बोलावलेल्या या विशेष बैठकीत पाणीपुरवठा कामातील तांत्रिक त्रुटींवर विशेष लक्ष वेधण्यात आले. नियमानुसार रस्त्याच्या पातळीपासून अडीच मीटर खोदकाम करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ दोन ते तीन फूट खोदकाम केले जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. पाईपलाईन पूर्ण झाल्यावर तातडीने कनेक्शन करणे, त्यानंतर टेस्टिंग आणि टेस्टिंग पूर्ण झाल्यावर खोदलेला भाग समपातळीवर आणून रस्त्याचे पॅचिंग करणे ही प्रक्रिया काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले.

शहरात सध्या अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत, मात्र तिथे अद्याप पाईपलाईनचे काम बाकी आहे. अशा परिस्थितीत रस्ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते खोदावे लागल्यास सार्वजनिक निधीचा मोठा अपव्यय होईल. त्यामुळे कोणत्या भागात काम पूर्ण झाले आहे आणि कुठे अपूर्ण आहे, याची स्पष्ट माहिती सादर करण्याचे निर्देश यावेळी आ. महाले यांनी दिले.

चिखलीची वाढती लोकसंख्या (सुमारे १ लाख) लक्षात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला असून, फिल्टर प्लांटची सध्याची १२.५० एमएल क्षमता वाढवून ती १७.५० एमएल करण्यात येणार आहे. तसेच, जुनेगाव येथे विशेष बाब म्हणून नवीन पाण्याची टाकी मंजूर करण्यात येणार आहे, तर संभाजीनगरातील जीर्ण टाकी पाडून त्या ठिकाणी नवी टाकी बांधली जाईल. प्रत्येक पाईपची लॅब टेस्टिंग करणे अनिवार्य करण्यात आले असून, नगर परिषदेच्या परवानगीशिवाय कोणतीही अवैध नळ जोडणी देऊ नये, असे निर्देशही आ. महाले यांनी दिले आहेत.

“कामाच्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रभागातून कामाच्या दर्जाबाबत तक्रार यायला नको. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचेल याची खात्री करावी,” असे याप्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.

या बैठकीस नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बीडगर, रामदासजी देव्हडे, पाणी पुरवठा सभापती दत्ता सुसर, महिला व बालकल्याण सभापती सौ. सुषमा विलास चव्हाण, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, रफिकसेठ, नगरसेवक दीपक वाधवाणी, मोहित व्यवहारे, तसेच कपिल खेडेकर, गोपाल देव्हडे, डॉ. महंमद इसरार, महंमद आसीफभाई, जकाउल्ला मिस्त्री, अमोल लहाने, पुरुषोत्तम वायाळ, प्रशांत भटकर, बाळू जाधव, युवराज भुसारी, दीपक खरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर, शिनगारे, गोकुळ शिंगणे, चेतन देशमुख, राम बनसोडे, आनंद बोंद्रे, सुरेंद्र ठाकूर, लोखंडे, मुंढे, कड आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version