– बुलढाणा एलसीबी व अंढेरा पोलिसांची २४ तासांत कारवाई; पाच आरोपींना अटक, पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त!
देऊळगाव घुबे/अंढेरा (राजेंद्र घुबे) : दुर्मिळ रत्ने आणि ‘सुलेमानी हकीक’ खड्यांच्या विक्रीचे आमिष दाखवून ग्राहकांना जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चिखली-देऊळगाव राजा मार्गावर एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अंढेरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (वय ३२, रा. नांदेड) यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. निलेश भोसले आणि जैकीचंद पवार (रा. साकेगाव) यांनी स्वामी यांना रत्ने व सुलेमानी हकीक खड्यांचे व्हिडिओ पाठवून खरेदीसाठी भुलवले होते. व्यवहारासाठी त्यांना चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील एका सराफी दुकानाजवळ बोलावण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी स्वामी तेथे पोहोचताच, आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून स्वामींकडील सोन्या-चांदीचे दागिने, अष्टधातूच्या वस्तू आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ८९ हजारांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर आणि अंढेराचे सहायक पोलीस निरीक्षक रूपेश शक्करगे यांचे पथक सक्रिय झाले. मुख्य आरोपी निलेश भोसले हा साकेगाव येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. उर्वरित आरोपी जालना जिल्ह्याच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांनी तब्बल तीन किलोमीटर पाठलाग करून त्यांना एका शेतातून पकडले.
अटकेतील आरोपींकडून सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, ४०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पीएसआय प्रताप बाजड, दिनेश घुगे, दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. या टोळीने अन्य राज्यांत किंवा जिल्ह्यांत अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

