जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के; देऊळगाव राजा तालुक्याची बाजी, मुलींचे यश नेत्रदीपक!
बुलढाणा (बाळू वानखेडे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी नोंदवली आहे. ९५.२२ टक्के निकालासह जिल्ह्याने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून, तालुकानिहाय आकडेवारीत देऊळगाव राजा तालुक्याने जिल्ह्यात सर्वाधिक टक्केवारी नोंदवली आहे.
जिल्ह्यातून एकूण ३४ हजार २०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ३२ हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाच्या टक्केवारीत मुलांच्या तुलनेत मुलींनी आघाडी घेतली आहे. मुलांचा निकाल ९४.३२ टक्के लागला असून, मुलींनी ९६.२९ टक्क्यांसह वर्चस्व राखले आहे. जिल्ह्यात एकूण १७ हजार ५४३ मुले आणि १५ हजार ३२ मुलींनी यशाची पताका फडकवली आहे.
देऊळगाव राजा अव्वल, शेगावची पिछेहाट!
तालुकानिहाय निकालात देऊळगाव राजा तालुक्याने ९८.८७ टक्क्यांसह जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले. त्यापाठोपाठ चिखली (९८.३८ टक्के), सिंदखेड राजा (९८.०९ टक्के) आणि बुलढाणा (९७.८२ टक्के) या तालुक्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. लोणार, मेहकर आणि खामगाव तालुक्यांचा निकालही समाधानकारक आहे. दुसरीकडे, शेगाव तालुक्याचा निकाल जिल्ह्यातील सर्वात कमी, म्हणजेच ८७.५५ टक्के इतका लागला आहे. मोताळा (९०.४९ टक्के), नांदुरा (९१.०७ टक्के) आणि मलकापूर (९१.१७ टक्के) या तालुक्यांची कामगिरी जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी राहिली आहे.
“विद्यार्थ्यांचे सातत्य आणि शिक्षक-पालकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच जिल्ह्याला विभागात प्रथम क्रमांक मिळवता आला. ज्या तालुक्यांचा निकाल कमी लागला आहे, तिथे गुणवत्ता वाढीसाठी आगामी काळात विशेष प्रयत्न केले जातील.” — अनिल अकाळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलढाणा.
जिल्ह्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाने जिल्ह्याच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

