कामगार दिनीच कामगारांची पिळवणूक; चिखली-धाड रस्त्यावर नियम धाब्यावर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– भर उन्हात मजुरांकडून काम; सुरक्षा साधनांचा अभाव आणि धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांचेही हाल!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी असताना, चिखली-धाड मुख्य रस्त्यावर मात्र कामगारांच्या हक्कांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भर उन्हात मजुरांकडून काम करून घेतले जात असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.

कंत्राटी कामगार कायदा १९७० आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अटींनुसार, १ मे रोजी कामगारांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. तातडीच्या कामासाठी कामगार उपलब्ध केल्यास त्यांना दुप्पट मजुरी देणे आवश्यक असते. मात्र, या रस्त्याच्या कामावर मजूर, मुकादम आणि सर्वेक्षण चमू (सर्वे टीम) सकाळी १०:५० च्या सुमारास कडक उन्हात राबताना दिसली. नाव न छापण्याच्या अटीवर काही कामगारांनी सांगितले की, सुट्टीचा कोणताही लाभ न मिळता त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे.

रस्त्याच्या कामावर असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडे साधे ओळखपत्र किंवा ‘सेफ्टी किट’ उपलब्ध नाही. इन्फ्रा कंपनीच्या अभियंत्यांपासून ते मजुरांपर्यंत कोणाकडेही सुरक्षा कवच नसल्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघात झाल्यास प्रथमोपचार किंवा रुग्णवाहिकेची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी दिसून आली नाही. रस्त्याचे काम सुरू असताना त्यावर पाणी मारणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे, मात्र येथे तसे होत नसल्याने धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना समोरचे वाहन दिसणे कठीण झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मुरमाचा लेयर टाकताना त्यावर पाणी मारून रोलर फिरवणे अपेक्षित असताना, निकृष्ट दर्जाचे काम रेटले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक जितू निकाळजे यांनी केला आहे.

 “येथील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून प्रवाशांच्या जिवाशी खेळ मांडला जात आहे. सुरक्षा साधनांचा अभाव आणि धुळीमुळे होणारे अपघात याला सर्वस्वी संबंधित कंत्राटदार आणि प्रशासन जबाबदार आहे.”

– जितू निकाळजे, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते

Share This Article
Exit mobile version