आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग; हार्वेस्टर ऑपरेटरचा खून

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

साखरखेर्डा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या; तांत्रिक तपासातून गुन्ह्याचा उलगडा!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आई-बहिणीवरून वारंवार करण्यात येणाऱ्या शिवीगाळीचा सूड उगवण्यासाठी सहकाऱ्यानेच हार्वेस्टर ऑपरेटरची लोखंडी सळईने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव उंडा (ता. मेहकर) शिवारात घडली. हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, साखरखेर्डा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या सहा तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. करमजीत सिंग ऊर्फ मंजीतसिंग जनक सिंग (५५, रा. संगरुळ, पंजाब) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी बबलीसींग करणसींग (३४, रा. पंजाब) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करमजीत सिंग हे २९ एप्रिल रोजी रात्री पिंपळगाव उंडा शिवारातील शेतात खाटेवर झोपले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिक शिवाजी काळे व्यायामाला जात असताना त्यांना करमजीत हे रक्ताच्या थारोळ्यात बाजेखाली पडलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच सरपंच उमेश काळे यांनी पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपासचक्र फिरवले. सुरुवातीला सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते, मात्र सर्व जण एकमेकांवर आरोप करत होते. पोलिसांनी अमितकुमार नावाच्या कामगाराची सखोल चौकशी केली असता, मृताचे आरोपी बबलीसींगसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी बबलीसींगला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृताने आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याने संतापाच्या भरात लोखंडी टामिने (सळई) करमजीत यांच्या डोक्यावर मागील बाजूस प्रहार केल्याचे आरोपीने सांगितले. विशेष म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने करमजीत यांच्या कानावर मोबाईल ठेवून दिला होता, जेणेकरून ते फोनवर बोलतानाच झोपले असावेत, असा भास व्हावा.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या करमजीत यांनी मदतीसाठी टाहो फोडला होता. त्यांनी रात्री १२ च्या सुमारास आपल्या मालकाला दोन वेळा फोनही केला, मात्र तो उचलला गेला नाही. वेळीच मदत न मिळाल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला. आरोपीने घटनेनंतर आपल्या भावाला फोन केला होता, हीच बाब तांत्रिक तपासात कळीची ठरली. सध्या करमजीत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथे पाठवण्यात आला असून, पंजाब येथील नातेवाईक आल्यावर तो त्यांच्या स्वाधीन केला जाणार आहे. न्यायालयाने आरोपी बबलीसींगला पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Exit mobile version