‘राजा शिवाजी’चा पडद्यावर ऐतिहासिक डंका; रितेशचा अभिनय आणि सलमान खानच्या ‘सरप्राईज’ एन्ट्रीने थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाची कमाल; जिवा महालाच्या भूमिकेत ‘भाईजान’ची दमदार झलक आणि अजय-अतुलचे थरारक संगीत!

मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरू पाहणारा रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक पट आज (दि.1 मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘वेड’च्या अभूतपूर्व यशानंतर रितेश पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत असून, त्याने छत्रपति शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर अत्यंत भव्यतेने साकारली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्यातील कलाकारांच्या मांदियाळीबद्दल कमालीची उत्सुकता होती. संजय दत्त (अफजल खान), अभिषेक बच्चन, विद्या बालन, जेनेलिया देशमुख अशा तगड्या स्टारकास्टमध्ये सलमान खानची एन्ट्री हे या चित्रपटाचे सर्वात मोठे गुपित ठरले. सलमानने या चित्रपटात महाराजांचे निष्ठावंत अंगरक्षक ‘जिवा महाला’ यांची भूमिका साकारली आहे. भगवा कुर्ता, डोक्यावर जिरेटोपसदृश पगडी, पिळदार मिशा आणि कपाळावर चंद्रकोर अशा आक्रमक आणि अस्सल मराठमोळ्या लुकमधील सलमानच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. “होता जिवा म्हणून वाचला शिवा” हा इतिहास सलमानच्या कॅमिओने पडद्यावर जिवंत केल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

“इतिहासाच्या पानात केवळ वाचले नाही, तर ज्यांनी आम्हाला जगायला शिकवले, अशा आमच्या राजाची गाथा मांडताना मला अभिमान वाटतो,” अशा शब्दांत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शनातही रितेशने आपली पकड सिद्ध केली आहे. विशेषतः अजय-अतुल यांच्या पार्श्वसंगीताने युद्धाचे प्रसंग आणि महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

सोशल मीडियावर ‘ब्लॉकबस्टर’चा कौल

चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिव्ह्यूचा पाऊस पाडला आहे.

  • प्रेक्षकांचा प्रतिसाद: “रितेश देशमुखच्या करिअरमधील हा सर्वोत्कृष्ट अभिनय आहे. सलमान खानची एन्ट्री पाहून अंगावर शहारे आले,” असे एका युजरने म्हटले आहे.
  • संजय दत्तचा दरारा: अफजल खानाच्या भूमिकेत संजय दत्तने निर्माण केलेली दहशत आणि रितेशसोबतचा त्याचा संघर्ष चित्रपटाला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जातो.

संपूर्ण भारतभर रिलीज

केवळ मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकही या ऐतिहासिक अनुभवासाठी गर्दी करत आहेत. पहिल्याच दिवशी मिळणारा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडीत काढणार, असे चित्र दिसत आहे. रितेशने एका मुलाखतीत सांगितले की, सलमान खानने स्वतःहून या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या मैत्रीतून आणि श्रद्धेतून साकारलेला हा ‘राजा शिवाजी’ चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी सिनेमाचा डंका जगभर गाजवत आहे.

https://x.com/i/status/2049875452161061056

Share This Article
Exit mobile version