आळंदी इंद्रायणी नदीपात्रात दोन महिलांचे मृतदेह आढळले

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-साडीने एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ; आत्महत्येचा संशय

आळंदी (अर्जुन मेदनकर) : तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीतील सिद्धबेट पाणी साठवण बंधाऱ्यात दोन अनोळखी महिलांचे मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. बुधवारी (दि. २९) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही महिला साडीच्या सहाय्याने एकमेकींना बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी एकत्रितपणे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी रात्री सिद्धबेट परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात काहीतरी तरंगत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. जवळ जाऊन पाहिल्यानंतर ते दोन महिलांचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी तात्काळ आळंदी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मृतांपैकी एका महिलेचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे, तर दुसऱ्या महिलेचे वय सुमारे ३५ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. या महिला नेमक्या कोण आहेत आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या महिला नातेवाईक होत्या की मायलेकी, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरात कोणती महिला बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे आळंदी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article
Exit mobile version