-भरधाव वाहनाचा जोरदार धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी
लोणार (वाजिद खान) : लोणार तालुक्यातील टिटवी ते लोणार रस्त्यावर २९ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. टिटवी गावाजवळील चढ-उतार रस्त्यावर हा भीषण अपघात घडला.
मृत तरुणाचे नाव सचिन केशव भगत (वय २८, रा. लोणार) असे असून जखमीचे नाव विठ्ठल विश्वनाथ कावळे (वय ४८, रा. धायफल) असे आहे. दोघेही कामानिमित्त टिटवी येथे गेले होते. काम आटोपून दुचाकी (क्र. एमएच-२८ एटी ३६८) वरून लोणारकडे परतत असताना टिटवी गावाजवळील चढ-उतार रस्त्यावरील शाळेसमोर भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की सचिन भगत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि वाटसरूंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला कळवले, मात्र रुग्णवाहिका येईपर्यंत सचिन यांचा मृत्यू झाला होता. लोणार ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लोणार-टिटवी रस्त्यावर गॅस पाइपलाइनचे खोदकाम सुरू असल्याने रस्त्यालगत मातीचे ढिग आणि अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यावर अंधार आणि अवजड वाहनांची वाढती वाहतूक यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे. ऐन उमेदीतील तरुणाचा मृत्यू झाल्याने लोणार शहरात शोककळा पसरली असून वृत्त लिहीपर्यंत मृतकाच्या नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

