उन्हाचा तडाखा… गर्भवतींसाठी वाढता धोका

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज

लोणार (वाजिद खान) : शहरात तापमानाचा पारा 43 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उकाडा, अंगाची लाही-लाही आणि अस्वस्थता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून गर्भवती महिलांसाठी हा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरत आहे. वाढत्या उष्णतेमुळे निर्जलीकरण, चक्कर येणे आणि रक्तदाबातील चढ-उतार यांसारख्या समस्या निर्माण होऊन गर्भवती महिलांसाठी धोक्याची घंटा वाजत आहे.

गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो. या काळात शरीरात अनेक शारीरिक बदल होत असल्याने वाढत्या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढणे, सूज येणे आणि काही वेळा अकाली प्रसूतीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. उष्णतेपासून बचावासाठी तज्ज्ञांनी दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळणे, सैल व सुती कपडे वापरणे, आहारात फळे व द्रवपदार्थांचा समावेश वाढवणे तसेच चक्कर येणे किंवा उलटी होणे याकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे. बाळाची हालचाल कमी जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

“उष्णतेच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र योग्य काळजी घेतल्यास धोका टाळता येऊ शकतो. जास्तीत जास्त नारळपाणी, लिंबूपाणी घ्यावे, पांढरे व हलक्या रंगाचे कपडे वापरावेत, टरबूज व काकडीचे सेवन वाढवावे तसेच मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत,” असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली मुंदडा, लोणार यांनी सांगितले. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास गर्भाशय आकुंचन पावण्याचा धोका वाढतो आणि अकाली प्रसूतीची शक्यता निर्माण होते. तसेच रक्तदाबात चढ-उतार होऊन भोवळ येणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. काही वेळा उष्माघात झाल्यास तातडीने उपचारांची गरज भासते. आईच्या शरीरातील पाण्याची कमतरता आणि वाढलेले तापमान यामुळे गर्भाला पुरेसा रक्तपुरवठा न होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो.

Share This Article
Exit mobile version