-अपुर्ण कामे व नियोजनाचा अभाव त्यामुळे शेतकरी व पाणी वापर संस्थांचे पदाधीकारी आक्रमक
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : देऊळगाव मही येथे 27 एप्रिल रोजी खडकपूर्णा प्रकल्प विभाग देऊळगाव राजा यांच्या वतीने देऊळगाव मही परिसरातील नारायणखेड येथील जगदंबा मंदिराच्या मंगल कार्यालयात खडकपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारक सभासद व पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण, महिलांचे सक्षमीकरण आणि कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता बापुसाहेब गाडे राहणार होते, परंतु काही कारणांमुळे ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्प देऊळगाव राजा विभागाच्या कार्यकारी अभियंता डावरे मॅडम यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. वाल्मी छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण समन्वयक रुपाली गोरे, मंडळ कृषी अधिकारी अंभोरे तसेच पाणी वापर संस्थांचे समन्वयक अमिलकंठावार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर समन्वयक विलास कोटेचा यांनी पाहुण्यांचा परिचय करून कार्यक्रमाची माहिती सादर केली. मात्र त्यांनी विषयाशी विसंगत माहिती दिल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी “मुळ विषयावर बोला” अशी मागणी करत त्यांच्या भाषणात अडथळा आणला आणि त्यामुळे त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.
यानंतर वाल्मीच्या प्रशिक्षण समन्वयक रुपाली गोरे यांनी महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन करताना 2005 च्या पाणी वापर संस्थांच्या कायद्याबाबत माहिती दिली. मात्र उपस्थितांनी पाणी वापर संस्थांच्या अडचणींवर चर्चा करण्याची मागणी केल्याने त्यांनी थोडक्यात आपले मनोगत मांडले. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी अंभोरे यांनी पीक नियोजनावर मार्गदर्शन केले, मात्र उपस्थितांमध्ये अस्वस्थता असल्याने त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. पुढे पाणी वापर संस्थांचे समन्वयक निळकंठावार यांनी पाणी वापर संस्था, त्यांचे व्यवस्थापन आणि पाणी नियोजनावर आढावा घेतला. कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती अधिक आणि शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने ही कार्यशाळा नेमकी कोणासाठी होती, असा प्रश्न उपस्थित झाला. उपस्थित शेतकऱ्यांनी चाऱ्या अपूर्ण असणे, जमिनीचा मोबदला न मिळणे तसेच पाणी वापर संस्थांच्या विविध अडचणी मांडल्या.
या वेळी पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी शेनफडराव घुबे यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजी भूमिकेवर नाराजी व्यक्त करत अपूर्ण कामे, ठेकेदारांचा वेळकाढूपणा आणि नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. त्यांनी पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, प्रकल्पस्तरीय संस्था स्थापन करणे, कार्यालयांची उभारणी तसेच पाणीपट्टी भरणाऱ्या संस्थांना प्रतिपूर्ती देण्याची मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी वसुंधरा पाणी वापर संस्था देऊळगाव घुबे, खंडोबा पाणी वापर संस्था कोनड-देऊळगाव घुबे, जिजामाता पाणी वापर संस्था भरोसा आणि बळीराजा पाणी वापर संस्था भरोसा-दे. धनगर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपाला डावरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

