बुलढाण्याचे ‘बीडीओ’ परजिल्ह्यात, ‘प्रभारी राज’ सुरू!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे आदेश; २० दिवसांसाठी नव्या नियुक्त्या!
– मेहकरचा गड धीरज जाधवांकडे, तर सिंदखेड राजाची जबाबदारी घुगेंवर!

बुलढाणा (बाळू वानखेडे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे पारदर्शक व निष्पक्ष मूल्यमापन करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ गटविकास अधिकाऱ्यांची (BDO) इतर महसूल विभागांत नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी २४ एप्रिल रोजी या सर्व अधिकाऱ्यांना २० दिवसांसाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले असून, त्यांच्या रिक्त जागी सहायक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे.

राज्यात २६ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले जात आहे. या मोहिमेत दुसऱ्या विभागातील तालुक्यांचे मूल्यमापन करण्यासाठी या अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वर्धा, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांचा समावेश आहे. अनेक तालुक्यांत सहायक गटविकास अधिकारी (ABDO) उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी कृषी अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे.

  • मेहकर: गटविकास अधिकारी दिनकर खरात यांची ‘पूर्णा’ येथे नियुक्ती झाल्याने, मेहकरचा प्रभार सहायक गटविकास अधिकारी धीरज जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
  • सिंदखेड राजा: अजित बांगर यांची ‘गंगाखेड’ येथे नियुक्ती झाली असून, प्रभार विस्तार अधिकारी बी. डी. घुगे सांभाळतील.
  • बुलढाणा: अमिता पवार (वर्धा नियुक्ती) यांच्या जागी जीटीसीच्या प्राचार्या दिपाली कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • इतर तालुके: चिखलीचे प्रभार गजानन पोफळे, देऊळगाव राजासाठी सुधाकर वायाळ, जळगाव जामोदचा प्रभार कृषी अधिकारी सुभाष गवई, तर खामगावची जबाबदारी आर. टी. सुरुसे यांच्याकडे असेल.

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे ग्रामीण प्रशासनाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या प्रक्रियेत स्थानिक दबावाशिवाय वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने ही अदलाबदल केली आहे. या २० दिवसांच्या कालावधीत संबंधित विस्तार अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांना आपल्या मूळ कर्तव्याव्यतिरिक्त पंचायत समितीचा पूर्ण कार्यभार सांभाळावा लागणार आहे.

Share This Article
Exit mobile version