– विद्या सोभागे रणांगणात उतरणार; स्थानिक निष्ठावंतांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असा संतप्त सवाल!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांबाबत अद्याप अनिश्चितता असली, तरी साखरखेर्डा सर्कलमध्ये राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरखेर्डा विभाग प्रमुख दिलीप सोभागे यांनी आपल्या पत्नी विद्या सोभागे यांची उमेदवारी जाहीर केल्याने, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये घुसमट सुरू झाली असून, “आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” असा आक्रमक सूर उमटत आहे.
साखरखेर्डा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होण्याची चिन्हे आहेत. या जागेसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव आणि माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचे चिरंजीव श्रीनिवास खेडेकर यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, हे उमेदवार ‘बाहेरचे’ असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. दुसरीकडे, गेली ३० वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन काम करणारे विभाग प्रमुख दिलीप सोभागे यांनी आता स्थानिक रेट्यापोटी पत्नी विद्या सोभागे यांना रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी ज्यांनी पायाला भिंगरी लावून काम केले, अशा शाखाप्रमुखांना आणि कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. “काही दलबदलू कार्यकर्त्यांमुळे मूळ शिवसैनिकांची गळचेपी होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिकांनाच प्राधान्य मिळावे,” अशी मागणी जोर धरत आहे. विद्या सोभागे यांच्यासोबतच सवडद येथील माजी सरपंच गजानन देशमुख यांच्या पत्नीही या गटातून इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (शरद पवार गट) मोठी पडझड झाली असून, माजी उपसभापती सुनील जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने या सर्कलचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. आता शिवसेनेतील ही अंतर्गत यादवी पक्षाला निवडणुकीत किती महागात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पंचायत समितीसाठीही चुरस!
केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर पंचायत समिती गणांमध्येही इच्छुकांची मोठी फौज उभी राहिली आहे. साखरखेर्डा पंचायत समितीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनीता दिलीप बेंडमाळी आणि पिंपळगाव सोनारा येथील माजी उपसरपंच रिना विजयसिंग राजपूत यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सवडद पंचायत समिती गण अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असून, येथे प्रजावती बाबुराव मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्यांनाही पक्षांतर्गत एका गटातून विरोध होत असल्याने उमेदवारी अर्जापूर्वीच शिवसेनेत गट-तटाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे.

