‘रस्ते मोकळे’ मोहिमेला वेग; चिखली तहसील प्रशासनाची एका दिवसात तिहेरी कामगिरी!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

थेट बांधावर निकाल : महीमळ, करतवाडी अन् बाभूळगावचा रस्तेकोंडीतून सुटका!

चिखली (राजेंद्र घुबे) – नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी निकाली काढण्यासाठी चिखली तहसील प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने एकाच दिवशी तीन विविध गावांमधील प्रलंबित शेतरस्ते मोकळे करत ‘तिहेरी’ यश संपादन केले. या धडाकेबाज कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या अनेक वर्षांपासूनचा रस्तेकोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

तहसीलदार विजय सवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने संयुक्तपणे कारवाई करत अडथळे दूर केले. महीमळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा शेतरस्ता प्रलंबित होता. नायब तहसीलदार वीर, ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख यांनी सरपंच पार्वताबाई खंबाईतकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने जेसीबीच्या साहाय्याने हा मार्ग मोकळा केला. याचा फायदा ६० ते ७० नागरिकांना होणार आहे.

करतवाडी ते अशोक सपकाळ यांच्या शेतापर्यंतचा सुमारे १ किलोमीटरचा रस्ता प्रशासनाने तत्परतेने खुला केला. भूमी अभिलेख विभागाचे खेडकर व महसूल कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम राबवली. या रस्तेमुक्तीमुळे २२५ नागरिकांचा प्रवास सुलभ झाला आहे. बाभूळगाव, सावरखेड व बुद्रुक येथील २.५० किलोमीटर लांबीचा शिवरस्ता मोकळा करताना प्रशासनाने अचूक मोजमाप व निर्णयक्षमतेचा परिचय दिला. भूमी अभिलेख विभागाने जागेवरच मोजणी करून सीमांकन निश्चित केले. यावेळी अर्चना बाहेकर, रजनी देशमुख व मोरे यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर अडचणी निकाली काढल्या. या मार्गामुळे १०० हून अधिक शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे.

एकाच दिवशी तीन ठिकाणी करण्यात आलेल्या या प्रभावी कारवाईमुळे चिखली तालुक्यातील ग्रामीण दळणवळणाला नवी गती मिळाली आहे. प्रशासकीय दिरंगाईला फाटा देत थेट बांधावर जाऊन प्रश्न सोडवल्याबद्दल तहसीलदार विजय सवडे आणि त्यांच्या पथकाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Share This Article
Exit mobile version