शिवरायांचा खरा इतिहास जनतेपर्यंत नेणारच! बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– आमदार संजय गायकवाड यांच्या नाकावर टिच्चून वंचित बहुजन आघाडीचा सार्वजनिक उपक्रम

बुलढाणा (बाळू वानखेडे): छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास पुसण्याचे किंवा तो विकृत करण्याचे कारस्थान करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली आहे. ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, बुलढाणा शहरात कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे धडाक्यात सामूहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमामुळे शिवरायांचा खरा इतिहास पुन्हा एकदा जनमानसात घुमला असून, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. विशेष म्हणजे, या पुस्तकाच्या लेखनावरून अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नाकावर टिच्चून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

आजवर काही मनुवादी प्रवृत्तींनी शिवरायांच्या इतिहासाशी वारंवार छेडछाड करून जनमानसात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र रचले आहे. या छडयंत्राचा बुरखा फाडण्यासाठी आणि सामान्यांपर्यंत शिवरायांची खरी ओळख पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे पाऊल उचलले आहे. संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर सामूहिक वाचनाला सुरुवात झाली.

यावेळी केवळ वाचनच झाले नाही, तर उपस्थित कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी-जय शिवाजी”, “जय भीम-जय शिवराय” अशा घोषणांनी संपूर्ण बुलढाणा शहर निनादले. शिवरायांचा इतिहास हा रयतेचा इतिहास आहे आणि तो त्याच स्वरूपात लोकांसमोर राहिला पाहिजे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या ऐतिहासिक उपक्रमाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यासह जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, जिल्हा विधी सल्लागार अमर इंगळे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात मनोज खरात, समाधान डोंगरे, दिलीप राठोड, संजय धुरंधर, दिलीप मुळे, गौतम गवई, पवन अवसरमोल, संतोष कदम, अशोक सपकाळ, अशोक सरदार, रमेश खरात, प्रवीण खरात, बाळू भिसे, दिलीप वाकोडे, विलास प्रधान, महेंद्र अवसरमोल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या इतिहासाची उजळणी केली. वंचित बहुजन आघाडीच्या या उपक्रमाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा असून, खोट्या इतिहासाला लगाम घालण्यासाठी हे वाचन आंदोलन यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

Share This Article
Exit mobile version